ऑनलाइन टीम
लंडन, दि. ११ - देशाला सध्या अत्यंत गरजेच्या असलेल्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम येत्या दोन वर्षांत राबवला जाणार असल्याचे केंद्रीय विधि आणि न्यायमंत्री सलमान खुर्शीद यांनी येथे सांगितले.
आर्थिक आणि राजकीय स्तरावर कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या मार्गावर सध्या आमची वाटचाल सुरू आहे. केवळ वेगवान विकासासाठी नव्हे तर सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक विकासाचा कार्यक्रम राबवला जात असल्याचेही ते म्हणाले. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मतैक्य असलेले सहकारी सध्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये आहेत, असे ते येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत म्हणाले.
सध्या सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ३० हजार रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत पुरवला जात आहे. येत्या काही काळात प्रत्येकाला घर मिळवून देण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी आशा वाटते, असेही त्यांनी सांगितले. सध्या एका कुटुंबातील किमान एका व्यक्तीला १०० दिवसांचा रोजगार आम्ही पुरवत आहोत. येत्या काही दिवसांत देशातील ६५ टक्के जनतेला अनुदानीत दराने अन्नधान्य पुरवण्यातही आम्ही यशस्वी ठरू, अशी आशा त्यांनी बोलून दाखवली.