Home » , , , » काय आहे 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद'

काय आहे 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद'

Written By Aurangabadlive on गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२ | २:१६ PM


मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. भारतातील पहिल्या दहा शहरांत औरंगाबादची गणना व्हावी अशी महत्त्वाकांक्षा या तिन्ही क्षेत्रातील मान्यवर बाळगून आहेत. ऐतिहासिक आणि शैक्षणिक 'हब' असलेले हे शहर काही दशकांपूर्वी मागास म्हणून गणले जात होते. मात्र, या शहराची झपाट्याने प्रगती होत गेली. या प्रगतीत 'बिझनेस आयकॉन्स'नी मोठे योगदान दिले. 
कठोर मेहनत, धाडसी निर्णय आणि प्रगतिशील दृष्टिकोन यामुळे अनेकांनी प्रगतीचे शिखर गाठले. अशा मान्यवर उद्योजकांचा प्रवास 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद'मध्ये शब्दबद्ध करण्यात आला आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील उद्योजकांचे 'आयकॉन' असलेले रतन टाटा यांच्या हस्ते या 'कॉफी टेबल बुक'चे थाटात प्रकाशन करण्यात आले. यामुळे औरंगाबादच्या 'बिझनेस आयकॉन्स'चे ऊर भरून आले.
देशाची समृद्धी सर्वदूर पोहोचावी - रतन टाटा
देशाची समृद्धी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, सर्वांना समान संधी देणारा हा देश व्हावा, हे माझे स्वप्न असल्याचे उद्योगजगताचे अनभिषिक्तसम्राट रतन टाटा यांनी आज येथे सांगितले. लोकमत मीडिया प्रा. लि.तर्फे प्रकाशित 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' या कॉफी टेबल पुस्तकाचे विमोचन त्यांच्या हस्ते झाले. एरवी भाषण करणार नाही, असे सांगणार्‍या रतन टाटा यांनी लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मोठय़ा खुबीने केलेल्या निवेदनामुळे उत्स्फूर्तपणे भाषण केले.
संत तुकाराम सिडको नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत, धूत ट्रान्समिशनचे राहुल धूत, अभिजित ग्रुपचे अभिषेक जैस्वाल, लोकमत ग्रुपचे चेअरमन खा. विजय दर्डा, तसेच सतीश मोटर्सचे सतीश लोढा यांची उपस्थिती होती. 
औरंगाबाद आणि जालना येथील उद्योग व्यापारातील मानबिंदू ठरलेल्या बिझनेस आयकॉनच्या उपस्थितीत आज रतन टाटा यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन हा अविस्मरणीय क्षण होता. तुडुंब भरलेल्या सभागृहात रतन टाटा यांचे आगमन झाले तेव्हा उद्योगजगतातील या मानबिंदूला सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मनोभावे जणू मानवंदनाच दिली. आपल्या छोटेखानी भाषणात रतन टाटा यांनी सर्वप्रथम औरंगाबादच्या बिझनेस आयकॉनचे मनापासून अभिनंदन केले आणि म्हणाले की, अनेकजण शिक्षण नसल्यामुळे या बाबतीत सुदैवी राहत नाहीत; पण ही समृद्धी इतर भागांमध्ये पसरावी आणि अमेरिकेप्रमाणे या समृद्धीतून सामान्यांना समान संधी मिळावी, हे माझे स्वप्न आहे. औरंगाबादला मी शाळकरी विद्यार्थी असताना अजिंठा आणि वेरूळ पाहण्यासाठी आलो होतो. त्यावेळेसचे शहर आणि आज निर्माण झालेली उद्योगनगरी यामध्ये महद अंतर आहे. या कार्यक्रमाला येण्यासाठी दर्डांनी केलेल्या मैत्रीपूर्ण पाठपुराव्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी त्यावेळी भाषण करणार नाही असे म्हणालो होतो, परंतु एकंदर आग्रहामुळे माझ्या नकाराचा सहजपणे होकार झाला. माझे वडील जमशेदजी टाटा हे स्व. जवाहरलाल दर्डा यांना राज्याचे ऊर्जामंत्री असल्यापासून ओळखत होते. त्यांनी माझा त्यांच्याशी एक चांगले मंत्री आणि सद्गृहस्थ असा परिचय करून दिला होता. आज त्यांचा वरदहस्त असलेल्या विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्याशी स्नेह जडला. औरंगाबादच्या उद्योगजगतातील एका 'ग्रेट मोमेंट'ला मला हजर राहता आले याबद्दल मला मनापासून आनंद आहे.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणात औरंगाबादच्या उद्योगविकासाचा आढावा घेऊन या शहरामध्ये आता केवळ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपले पाऊल ठेवण्याची गरज आहे, असे सांगताच अक्षरश: टाळ्यांचा पाऊस पडला. दर्डा यांनी सांगितले की, अशा टाळ्या नेत्यांना कधीच पडत नाहीत; परंतु औरंगाबादकरांना आपल्या विषयी उत्कट आदर असल्याचे या टाळ्यांच्या कडकडाटातून आपणास जाणवले असेल. आपण बोलणार नाही असे म्हणालात म्हणून मी आग्रहही करणार नाही; पण टाटामय झालेल्या या सभागृहाची आपण बोलावेच, अशी इच्छा दिसते. 
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी उपस्थित राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत, लोकमत मीडिया प्रा.लि.चे अध्यक्ष खा. विजय दर्डा, अभिजित ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक जयस्वाल, धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत, सतीश मोटर्सचे संचालक सतीश लोढा, 'लोकमत'चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा.
'फ्रेंडली पर्स्युएशन', 'पर्स्युएशन विथ स्माईल'
राजेंद्र दर्डा यांची समयसूचकता आणि रतन टाटा यांचे मनोगत
एखादी गोष्ट खुबीने करण्यात आणि एखाद्याचे मन वळविण्यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे कसब वाखाणण्यासारखे असते, याचा पुन:प्रत्यय मंगळवारी सिडको नाट्यगृहात झालेल्या 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आला. देशाच्या उद्योग जगतातील 'बडी हस्ती' असलेले रतन टाटा हे औरंगाबादेतील उद्योजकांसमोर आपल्या भावना व्यक्त करतात, ही बाब उद्योजकांना नक्कीच अभिमानास्पद वाटली. टाटा यांचे चार शब्द ऐकता यावेत यासाठी आसुसलेले कान टाटा यांच्या मौलिक मार्गदर्शनानंतर तृप्त तृप्त झाले. अर्थात, हे सर्व घडले ते शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यातील समयसूचकता आणि शहराच्या विकासासाठी असलेल्या विशाल दृष्टिकोनामुळेच.
'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' या पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी राजेंद्र दर्डा आणि लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा हे टाटा यांच्याकडे गेले असता त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे कबूल केले; मात्र अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार कार्यक्रमाची रूपरेषाही तशीच होती. टाटा यांच्या हस्ते 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. उद्योगपती नंदकिशोर कागलीवाल, मानसिंग पवार, अभिषेक जैस्वाल आणि वेणूगोपाल धूत यांनी मनोगते व्यक्त केली. या सर्वांनीच रतन टाटा यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरू ऑफ बिझनेस, ट्रली इंडियन आयडॉल, असा टाटा यांचा उल्लेख वक्त्यांनी केला. टाटा यांच्या संदर्भाने होत असलेल्या या उल्लेखाने सभागृहातील वातावरण भारावलेले दिसले. जागतिक कीर्तीच्या या उद्योजकाने काही तरी बोलावे, असेच सर्वांना वाटत होते. तोपर्यंत रतन टाटा मनोगत व्यक्त करणार किंवा नाही, याबाबत सभागृहात उत्सुकता होती. याच वेळी राजेंद्र दर्डा हे भाषण करण्यासाठी उभे राहिले. शहरातील उद्योग जगताचा आढावा त्यांनी घेतला. मनोगत संपवीत असताना राजेंद्र दर्डा हे रतन टाटा यांच्याकडे अचानक पाहत म्हणाले, 'सर, मला माहीत आहे की तुम्ही या ठिकाणी भाषण करणार नाहीत. तुम्ही भाषण करावे, असा आग्रहही मी करणार नाही; पण मला असे वाटते की, औरंगाबादच्या या आयकॉन्सना आपला सल्ला मिळाल्यास त्यातून या आयकॉन्सना नवीन काही तरी शिकायला मिळेल.'
राजेंद्र दर्डा यांनी मोठय़ा खुबीने टाटा यांना केलेल्या विनंतीमुळे सभागृहातील श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा गजर चालूच राहिला. टाळ्यांच्या कडकडाटातून उद्योजक आणि श्रोत्यांनी टाटा यांनी काही तरी बोलावे असेच सूचित केले. त्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी पुन्हा 'मी भाषण करण्याचा आग्रह आपणाला करणार नाही,' असे सांगून मनोगत संपविले. तोपर्यंत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. मनोगत संपविताना 'जयहिंद, जय महाराष्ट्र' असे म्हणत राजेंद्र दर्डा आपल्या जागेकडे वळत असतानाच रतन टाटा उभे राहिले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते माईकजवळ येईपर्यंत जोरदार टाळ्या वाजल्या. त्यांनी भाषण सुरू करताच सभागृहाचे कान त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आसुसले.
राजेंद्र दर्डा यांनी मोठय़ा कौशल्याने मन वळविलेले रतन टाटा यांनीही मग आपल्या भाषणात 'फ्रेंडली पर्स्युएशन', 'पर्स्युएशन विथ स्माईल' असा उल्लेख करीत त्यांना दाद दिली. राजेंद्र दर्डा यांच्या समयसूचकतेमुळे औरंगाबादवासीयांना एक 'ग्रेट' अनुभव घेता आला.
औद्योगिक विकासाचे प्रभावी सादरीकरण
सादरीकरणाच्या शेवटी मुकुंद कुलकर्णी यांनी टाटा यांना आता तुम्हीच आमचे मार्गदर्शक व्हा, अशी साद घातली. औरंगाबादच्या उद्योगांनी एक उंची गाठल्याचे आपणास वाटत असेल तर पुढील उंची गाठण्यासाठी मदत करा किंवा पल्ला गाठला नाही असे वाटत असेल, तर तो गाठण्यास मदत करा, अशी विनंती कुलकर्णी यांनी केली. या कार्यक्रमात 'सीएमआयए'चे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी केलेले 'पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन' चर्चेचा विषय ठरले. 
'इंडस्ट्रीयल औरंगाबाद : ग्रोथ ड्रायव्हर्स अँड पोटेन्शियल' या विषयावरील प्रभावी सादरीकरणाद्वारे कुलकर्णी यांनी औरंगाबादच्या औद्योगिक विकासाचा आढावा घेतला.
कालचे औरंगाबाद : ८0 च्या दशकात औरंगाबादची ओळख एक पर्यटनस्थळ अशी होती. जेमतेम साडेतीन लाख लोकसंख्येच्या या शहरात उद्योगांचे अत्यल्प अस्तित्व होते. ९0 च्या दशकात औरंगाबादची वाटचाल आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या शहराकडे झाली. स्कोडा, बजाज, व्हिडिओकॉन, फोस्टर, गुडइअर, जॉन्सन अँड जॉन्सन, केनस्टार, लोम्बार्डिनी, कोलगेट - पामोलिव्ह, वोखार्ड, इंड्रेस - हाऊझर, गरवारे, निर्लेप, ग्रीव्हज, सिमेन्स, स्टरलाईट आदी बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे २000 यावर्षी या शहराचे रूपांतर परिपक्व औद्योगिक केंद्रात झाले. 
आजचे औरंगाबाद : सर्व बाजूंनी चौफेर विस्तार होत असलेले औरंगाबाद शहर ऑटोमोबाईल व फार्मा हब झाले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) देशातील २२ कंपन्यांना मान्यता दिली आहे. यापैकी पाच कंपन्या एकट्या औरंगाबादेत आहेत. औरंगाबाद, जालना हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे बियाणे निर्मितीचे केंद्र बनले आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या स्टीलची निर्मिती करणारे देशातील सर्वात मोठे केंद्र म्हणून औरंगाबाद, जालन्याची ओळख निर्माण झाली आहे. देशात तयार होणार्‍या बीअरपैकी ७0 टक्के बीअर या शहरात तयार होते. गेल्या वर्षी राज्य सरकारच्या तिजोरीत या शहराने ३,३00 कोटी रुपये व्हॅटच्या रूपाने भरले आहेत. 
जमेच्या बाजू : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'मुंबई - पुणे- नाशिक -औरंगाबाद' या सुवर्ण चतुष्कोनचा भाग, रस्ते वाहतुकीसाठी मध्यवर्ती ठिकाण तसेच देशातील प्रमुख शहरात जाण्यासाठी रस्त्याचे जाळे. उत्कृष्ट रेल्वे कनेक्टिव्हिटी तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ. 'आयजीटीआर', 'डीओईसीसी', सिपेट, 'यूडीसीटी', इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय या संबंधित क्षेत्रातील कुशाग्र मनुष्यबळ निर्माण करणार्‍या संस्था या शहरात आहेत. एकाच वेळी दीडशेवर र्मसिडीजची खरेदी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
उद्याचे औरंगाबाद :
ऑटोमाबाईल क्षेत्रातील उद्योगांना फायद्याच्या ठरणार्‍या मराठवाडा ऑटो क्लस्टर या प्रकल्पाची वेगाने उभारणी सुरू आहे. ८१ कोटी खर्च करून ऑटो क्लस्टर उभारले जात आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) औरंगाबाद हे मेगा औद्योगिक शहर बनणार आहे. 'आयटी' क्षेत्रातील 'इर्मजिंग डेस्टीनेशन' म्हणून हे शहर नावारूपास येत आहे. 'आयटी' मधील देशातील पहिल्या २५ शहरांत नॅसकॉमने या शहराचा समावेश केला आहे. राज्य सरकारचा 'आयटी' पुरस्कार मिळविणार्‍या चार कंपन्या येथे कार्यरत आहेत. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमुळे पाच हजारांवर रोजगार उपलब्ध झाले आहेत. मुंबई, बंगळुरू व गुरगाव या 'आयटी' क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या शहरांच्या तुलनेत येथील 'कॉस्ट ऑफ ऑपरेशन' तब्बल ३४ टक्क्यांनी कमी आहे.
अहंकार सोडला तरच विकास...
- वेणूगोपाल धूत, अध्यक्ष, व्हिडिओकॉन उद्योग समूह 
टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्याबरोबर बसण्याचे सौभाग्य लाभले. हा पवित्र क्षण असल्याचे व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत म्हणाले. १९८१ मध्ये जेआरडी टाटा यांच्याकडून रतन टाटा यांनी समूहाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी सर्मथपणे उद्योग समूहाचे काम पाहिले. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून धूत यांनी भागवतातील पाराशराची एक कथा सांगितली. ते म्हणाले की, व्यासमुनीचा मुलगा शुकमुनी होता. व्यासाने अनेक शिष्य घडविले; पण शुकमुनी आपल्या वडिलांचे ऐकत नव्हता. शुकमुनीने व्यासांकडून कोणतेही ज्ञान घेतले नाही. शेवटी व्यासांनी शुकमुनीला जनकराजाकडे पाठविले. शुकमुनीसाठी जेव्हा जनकराजाने दार उघडले तेव्हा जनकराजाने शुकाला प्रश्न विचारला तू कोण आहेस. तेव्हा शुकाने मी शुक आहे, मी शुक आहे, मी शुक आहे, असे उत्तर दिले. जनकराजाला तो व्यासमुनींचा मुलगा आहे किंवा इतर उत्तर अपेक्षित होते. शुकमुनी सातत्याने 'मी' चा पाढा लावला होता. त्याला अहंकाराने घेरले होते. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांच्यात अहंकार दिसत नाही. औरंगाबादेत व्हिडिओकॉन, बजाज या दोन्ही उद्योग समूहांचा विकास स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणेने झाला आहे. त्यांच्यामुळे ते उद्योग उभे राहिले. आज त्यांचे दोन सुपुत्र विजय व राजेंद्र दर्डा म्हणजे राम, लक्ष्मणाची जोडी आहे, असे धूत म्हणाले. 
शहर वेगाने उद्योजकतेकडे वळेल...
- अभिषेक जैस्वाल, अभिजित ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक
शहराला वेगाने उद्योजकतेकडे वळविणारी मोठी प्रेरणा आज येथे उपस्थित असलेल्या बिझनेस आयकॉन्सला मिळाली आहे. लोकमत बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबादची युनिक ओळख निर्माण होईल, यात शंका नाही.
मला आणि येणार्‍या तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणादायी ठरतील अशा बिझनेस आयकॉन्सच्या 'यशकथा' बुकमध्ये आहेत. बुद्धिमत्ता आणि परिश्रमाच्या बळावर येथील उद्योजकांनी शहराची युनिक ओळख निर्माण केली आहे. भविष्यातील उद्योजक घडण्यामध्ये आयकॉन्सचा मोठा वाटा असेल. येथील उद्योजकांमध्ये 'एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेन्ट'आहे. त्या टॅलेन्टला आयकॉन्समुळे प्रकाशमान होण्याची संधी मिळाली आहे. आयकॉन्सच्या यशकथेतून येथील नवउद्योजक प्रेरणा घेतील, याची मला खात्री आहे.
क्षणचित्रे 
महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी अनेक जण प्रयत्नशील होता. सिडको एन-५ येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराकडे जाणारे रस्ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत फुलून गेले होते. वेळेच्या १५ मिनिटे आधी येण्याची सूचना निमंत्रण पत्रिकेवरच होती. शिवाय सुटाबुटात येण्याबद्दलचा आग्रहही होता. त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. नाट्यमंदिरात आलेल्या निमंत्रितांमध्ये वेशभूषेची ही समानता उठून दिसत होती. किंबहुना या कार्यक्रमाचे हे एक वैशिष्ट्यच ठरले.
- या कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रतन टाटा यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीप प्रज्वलित करण्यात आले. आपल्या भाषणातही रतन टाटा यांनी जवाहरलाल दर्डा यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
- नाट्यमंदिर हाऊसफुल झाले होते. बाल्कनीतही बर्‍याच जणांना उभे राहावे लागले. खाली मुख्य सभागृहातही अनेकांनी उभे राहून का होईना या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
- राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी रतन टाटा आणि एकूणच या कार्यक्रमावर आपला प्रभाव टाकला. त्यांचे भाषण सभागृहाने डोक्यावर घेतले. त्यांचे भाषण संपल्याबरोबर त्यातील तळमळ लक्षात घेऊन निवेदिकेने नाव पुकारण्याचीही वाट न पाहता रतन टाटा बोलायला उभे राहिले आणि उद्योग क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण व्यक्तीसाठी टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.
- रतन टाटा यांचे भाषण संक्षिप्तच होते; पण ते अर्थपूर्ण होते. त्यांच्या भाषणाचा शब्दन्शब्द उपस्थित सारेच जण मन लावून ऐकत होते. एखादी मोठी घोषणा होते की काय ही उत्सुकता ताणली जाऊ लागली होती.
- एवढा शिस्तबद्ध, देखणा कार्यक्रम यापूर्वी आम्ही अनुभवला नव्हता. लोकमतने ही संधी दिली, याबद्दल अनेक जण कौतुकाचे बोल काढत होते.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.