प्रतिनिधी
औरंगाबाद : शासकीय कामांध्ये कोट्यावधीची गुंतवणूक करण्याची थाप मारून एका ठेकेदाराला दोघांनी लाखोचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय ठेकेदार सुनील मधुकर नागरगोजे (३५, रा. गारखेडा परिसर) यांची काही दिवसांपूर्वी शिवशंकर कॉलनीत राहणारे अमोल सुरेश यादव आणि अनुपमा मुथा या दोघांशी ओळख झाली. आम्ही पती - पत्नी असल्याचे सांगून तुच्या व्यवसायात दोन कोटी रुपये गुंतवण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. यानंतर या दोघांनी नागरगोजे यांच्या बरोबर चांगलीच ओळख वाढविली. या दरम्यान अनुपमा मुथा हिने माझा चुलत भाऊ हा अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर
गुंतवणूक करणार आहे. तो भारतात फिरण्यासाठी येत असून त्यास चार चाकी वाहनाची गरज आहे, असे सांगुन नागरगोजे यांच्या कडून २ लाख २० हजार धनादेशव्दारे घेतले. याच दरम्यान अमोल यादव यानेही नागरगोजे यांच्याकडून रोख ६ लाख ५० हजार रूपये हात उसणे घेतले. कालांतराने त्यांनी पैसे व गाडी परत मागितले असता आरोपींनी पोलीस खात्यामार्फत इन्काऊंटर करण्याची धमकी
दिली. आपल्याला गंडविल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.