प्रतिनिधी
औरंगाबाद : दहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने नारेगावातील शिवसैनिकांनी खा. चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याची दखल घेऊन खा. खैरे यांनी तत्काळ काम सुरु करण्याबाबत मनपास सुचना केल्या. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या रखडलेल्या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली.
नारेगाव येथील मुख्य रस्त्याचे काम डिफर पेमेंट मधून मंजूर झाले. हे काम तत्काळ सुरु करण्यात यावे, यासाठी फेबु्रवारी महिन्यात नारेगाव शिवसेना शाखेच्या वतीने मनपाच्या कचरा वाहणाèया गाड्या पंधरा घंटे अडवून आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती विकास जैन, अभियंता एम.डी. सोनवणे यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून ठेकेदारांनी रस्त्यावर खडी टाकून काम बंद केले. यामुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाल्याने नगरसेवक मनीष दहिहंडे, माजी सभागृह नेता महादेव सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नारेगांव शिवसेना शाखेच्या वतीने खा. खैरे यांच्या मछली खडक येथील संपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. याची दखल घेत खा. खैरे यांनी मनपाचे अधिकारी, महापौर कला ओझा, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तत्काळ काम सुरु करण्याच्या सुचना केल्या. दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजता काम सुरु करण्यात आले.