प्रतिनिधी
औरंगाबाद : प्रवाशांवर लक्ष ठेवून पर्सची चोरी करणारी महिला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली असून, मीराबाई अंकुश खुळे (४०) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून पाच तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
गारखेडा भागातील वसाहतीत तिचे घर आहे. तिच्या घरात एसी होता. घरही चांगलेच पक्के बांधलेले होते. शेजारी मंडळी यामुळे तिच्याबाबत संशय घेत होते. कुणीतरी पोलिसांनाही तिच्याबद्दल माहिती सांगितली. त्यामुळे पोलिसांनी तिच्या लक्ष ठेवणे सुरू केले होते. आठ दिवस पोलिसांनी महिलेवर पाळत ठेवली. तेव्हा ती मजुरीसाठी जात नाही तर सिडको बसस्थानकावरून बसमध्ये बसते. रात्री उशिरा घरी परत येते, असे लक्षात आले. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. तेव्हा तिने बस प्रवाशांना हेरून पर्स चोरी करत असल्याचे सांगितले. ती बाहेरगावी जाणाèया बस निवडत होती. त्यातही गर्दी असलेल्या बसची निवड करायची. महिलांसाठी राखीव असलेल्या आसनावर बसायचे. आजूबाजूच्या प्रवाशांना गप्पांमध्ये अडकवायची व काही महिला प्रवाशांवर नजर ठेवायची आणि तिची पर्स अलगद स्वत: जवळच्या पिशवीत टाकायची. या महिलेने पहिल्या पतीला सोडले असून सध्या ती अंकुश दादाभाऊ खुळे यांच्यासोबत राहते. पाच वर्षांपासून हा चोरीचा धंदा सुरू असल्याचे तिने सांगितले.