प्रतिनिधी
औरंगाबाद : शेतकèयाला मारहाण करून दरोडेखोरांनी त्याची पत्नी व दिवाळीसाठी आलेल्या मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले व रोख २५० रुपये असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मिटमिटा शिवारातील दर्शनसिंग सोधी यांच्या शेतवस्तीवर घडली.
एकनाथ गणपत जायभाये (४९, मूळ रा. हनुमंतखेडा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) काही वर्षांपासून दर्शनसिंग सोधी यांची शेती खावटी पद्धतीने करतात. ते सोधी यांच्या फार्महाऊसशेजारील एका घरात पत्नीसह राहत असून, दिवाळीसाठी दोन दिवसांपूर्वीच त्यांची मुलगी आली होती. मध्यरात्री १.३० ते २ वाजेदरम्यान कुत्रे भुंकायला लागले म्हणून एकनाथ जायभाये घराबाहेर आले, तेव्हा समोरच हाफ चड्डी व बनियान घातलेले ७-८ धिप्पाड अनोळखी व्यक्ती त्यांना दिसले. ते दरोडेखोर असावेत, या भीतीने एकनाथ जायभाये हे लगबगीने परत घरात जाऊन आतून दरवाजा लावू लागले. त्यावेळी दरोडेखोरांनी बाहेरून दरवाजा लोटून घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी त्यांच्याकडे दागिने व पैशाची मागणी केली. दरोडेखोरांनी एकनाथ जायभाये यांना काठीने मारहाण करीत त्यांच्या मुलीच्या व पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले व रोख २५० रुपये घेतले. एकनाथ जायभाये यांचा मोबाईल घेऊन त्यातील सिमकार्ड फेकून दिले व मोबाईल सोबत नेला. घटना सकाळी पोलिसांना समजताच छावणी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंढे व पोलिस कर्मचाèयांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. श्वानपथकाने दरोडेखोरांचा काही अंतरापर्यंतच माग काढला.