एखादे काम करायचे असल्यास ते करण्यापूर्वी हजारवेळा विचार करा; पण एकदा तुम्ही ते काम केले की मग मात्र त्याचे जे काही परिणाम होणार आहेत, ते भोगावयास तयार रहा, असे आपल्याकडे नेहमी समजून सांगितले जाते. मात्र, कोणत्याही परिणामांचा विचार न करता किंवा ते काम केल्यामुळे भविष्यात येणाèया अडचणींचा विचार न करता माणूस अशी कामे करीत राहतो आणि मग अडचणीत आल्यावर मदतीसाठी धावाधाव करू लागतो. ही परंपरा अनादीकाळापासून सुरूच आहे आणि ती तशीच सुरूही राहील. झालेल्या चुकांमधून धडा घेईल, तो माणूस कसला? हे सारं सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत, खरे तर वर्षात म्हणायला हवे, बिबट्याने मानवी वस्तीत घुसून हल्ले करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. काल, शुक्रवारीच मुंबईच्या पवईनजीकच्या परिसरातील मोरोशी पाडा या आदिवासी पाड्यावर बिबट्याने सीताबाई पागी या महिलेवर हल्ला करून तिचा जीव घेतला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने या महिलेचा फडशा पाडला आणि तो जंगलात पळून गेला. अर्थात, त्याआधी त्याने या महिलेचा मृतदेह जंगलात पळवून नेण्याचाही प्रयत्न केल्याचे गावकरी सांगतात. पण मृत्यूच्या आधी त्या महिलेने आणि तिच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी गावकèयांनी आरडाओरड केल्याने बिबट्याचा प्रयत्न हुकला. हे खरं असलं तरी मानवी वस्तीतील बिबट्याचा वाढता वावर आणि माणसांवर होणारे त्याचे हल्ले किती वाढले आहेत, हा प्रश्न किती गंभीर आहे, हेच दाखविणारी ही आणखी एक घटना ठरली आहे. बिबट्याने मानवावर qकवा मानवी वस्तीत घुसून दहशत माजविण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. केवळ मुंबईतच नाही तर मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरापासून नाशिक, नेवाश्याच्या भेंड्यापर्यंत आणि तेथून चंद्रपूर, नागपूर अशा ठिकाणांपर्यंत बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चारच महिन्यांपूर्वी मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात असलेल्या शंकर टेकडी भागात सुनिता थोरात नावाच्या चिमुरडीला बिबट्याने तिच्या आईच्या डोळ्यादेखत झडप घालून पळवून नेले होते. दुसèया दिवशी सकाळी या भागाला लागूनच असलेल्या जंगलात सुनिताचा मृतदेह सापडला होता. त्याआधी मे महिन्यात याच उद्यानाच्या बाजूलाच असलेल्या मथाई पाड्याजवळच्या चरणदेवी पाड्यातील सुन्नी सोनी या मुलाला बिबट्याने ठार केले होते. मध्यंतरी तर मुलुंडसारख्या ठिकाणी भरवस्तीत घुसून बिबट्याने शाळेतच मुक्काम ठोकण्याचाही प्रकार घडला होता. येऊर, भांडूप, मुलुंड, घोडबंदर रोड आणि परिसर, दहिसर, बोरिवली, मालाड, कांदिवली या मुंबई आणि ठाण्यातील भागांमध्येही सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत आहे. गेल्या सहा- सात महिन्यांत बिबट्याने पंधरापेक्षा अधिक जणांवर हल्ला केला असल्याचे आकडेवारी सांगते. बिबट्याचे मूळ वावरण्याचे आणि राहण्याचे ठिकाण म्हणजे जंगल. पण आजवर जंगलात आणि राष्ट्रीय उद्यानात दिसणारा हा बिबट्या मानवी वस्तीत घुसून दहशत माजवू लागल्याने सर्वांना वाटणारी qचता साहजिकच आहे. पण ही qचता मानवाने स्वत:च वाढवून घेतली आहे, असेच म्हणावे लागेल. जंगली प्राण्यांचा, qहस्त्र श्वापदांचा माणसांच्या वस्तीतील वावर का वाढला आहे?, माणसांवरील बिबट्यांच्या हल्ले का वाढले आहेत?, बिबट्याचे हल्ले रोखता येणे शक्य आहे का?, असे एक ना अनेक प्रश्न या घटनांवरून समोर आले असून, त्यावर विचार करायला गेल्यास या घटनांना बिबट्यांपेक्षा आपसूकच माणुसच अधिक जबाबदार असल्याचे स्पष्ट होईल. शहराच्या मध्यभागी राष्ट्रीय उद्यान असलेले मुंबई हे एकमेव शहर आहे. मात्र, वाढती नागरीवस्ती या शहरातील राष्ट्रीय उद्यानाचे आणि जंगलाचे अस्तित्वच पुसून टाकायला निघाली आहे. दररोज एक नवे बांधकाम या जंगलांच्या परिसरात उभे रहात आहे. बांधकामाचा अजगरी विळखाच या उद्यानाला आणि जंगलांना पडत चालला आहे. १०४ चौरस किलोमीटरे क्षेत्रफळ असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगराच्या मधोमध वसलेले आहे. उपनगराचे दोन भागच या उद्यानाने केले आहेत. १९७० साली या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा झाली, त्यावेळीही या परिसराला लागून मानवी वस्ती होतीच. पण, गेल्या ४२ वर्षांत या भागातील लोकसंख्येचा आकडा लाखोंच्या घरात गेला आहे. माणूस जंगलापासून दूर होता, तोपर्यंत ठिक होतं. पण त्याने जंगलावरच आक्रमण सुरू केलं आणि परिस्थितीच बदलली. या उद्यानात माणसाची घुसखोरी एवढी वाढली आहे की त्यामुळे उद्यानाची पूर्व-पश्चिम बाजू, दक्षिण बाजू आणि मानवी वस्ती यांच्यातील सीमारेषाच पुसली गेली आहे. उद्यान आणि मानवी वस्ती एकच झाली आहे. अशावेळी बिबट्या मानवी वस्तीत घुसतोय, असे म्हणायला काय अर्थ आहे? माणसानंच बिबट्याच्या वस्तीवर अतिक्रमण केल्यावर बिबट्याने कुठे जायचे? तो मानवी वस्तीत घुसला तर त्याचे काय चुकते? बिबट्याने मानवी वस्तीत नव्हे तर माणसानेच बिबट्याच्या वस्तीत घुसखोरी केली आहे. वाढत्या बांधकामांमुळे, वाहनांच्या संख्येमुळे जंगलांकडे जाणारे रस्तेच बंद होत आहेत. बिबट्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्याने तो मानवी वस्तीत असाच घुसत राहील. त्यातून बिबट्या आणि माणूस यांच्यातील जगण्यासाठीचा संघर्षही वाढतच जाणार आहे. हा फक्त या राष्ट्रीय उद्यानापुरताच प्रश्न नसून इतरत्रही तीच परिस्थिती आहे. माणसांचा जंगलातील हस्तक्षेप वाढत चालला आहे. राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने माणूस जंगलांवर अतिक्रमण करीत आहे. त्याचे दुष्परिणाम मात्र आजवर जंगलात मुक्तपणे वावरणाèया प्राण्यांना भोगावे लागत आहेत. या प्राण्यांना जंगलात सहज उपलब्ध होणारे कुत्रे, कोंबडे आणि छोटे प्राणी यांच्यासारखे भक्ष्य कमी होऊ लागले आहे. त्यातूनच ते भक्ष्याच्या शोधासाठी मानवी वस्तीत घुसत आहेत. हे सत्य माणसांच्या कधी लक्षात येणार? वारंवार घडणाèया या घटनांतून माणूस काही धडा घेणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. इतरांनी आपल्या जागेवर अतिक्रमण केले की आपल्याला वाईट वाटते. आपण त्याविरोधात प्राणपणापासून संघर्ष करायला उठतो. हेच बिबट्यांनी केले, तर त्यांची चूक कशी म्हणावी. भविष्यात हे प्रकार वाढत जाऊन परिस्थिती गंभीर होत जाणार आहे. एकंदरीत माणसांना त्यांची चूक लक्षात आणून देत या मुद्यावर जनजागृती करणे हाच या समस्येवर एकमेव उपाय दिसतो.