प्रतिनिधी
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाचा नेत्र विभाग आता रुपडे पालटू लागला आहे. यापूर्वी या विभागात फेको शस्त्रक्रिया सुविधा नव्हती. मात्र आता घाटीत ही सुविधा उपलब्ध झाली असून, या सुविधेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी केले. आधुनिक पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया घाटीतही करता यावी यासाठी विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे यांनी विशेष पाठपुरावा केला. आणि राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा अंतर्गत ही सुविधा नेत्र विभागात उपलब्ध करून घेतली. त्यामुळे आता साध्या यंत्रावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज संपली आहे. खाजगी रुग्णालयांप्रमाणे घाटीतही महागडे फेको यंत्र आल्याने उपचारांचा दर्जा सुधारणा आहे. घाटीत लहान मुलांचा नेत्रकक्ष स्थापन करण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. ६० लाख रुपयांची यंत्रसाहित्य त्यासाठी लवकरच मिळेल, असे डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले. फेको सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय केंद्र संचालक डॉ. विलास वांगीकर, उपअधिष्ठाता डॉ. छाया दिवाण, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे, डॉ. पूर्णचंद्र लामघरे, डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. अजित दामले, डॉ. झिने, डॉ. भारत सोनवणे, नेत्र विभागातील डॉ. काशीनाथ चौधरी, डॉ. वैशाली उणे, डॉ. अर्चना वरे, मेटड्ढन छाया चामले आदी उपस्थित होते.