अनेकांना स्मरणशक्ती कमी असते. डोकं असतं, ते वेळच्या वेळी वापरलंही जातं. पण नक्की कधी, काय केले, हेच लक्षात राहत नाही... यालाच स्मरणशक्ती कमी झाली असं म्हटलं जातं. ही स्मरणशक्ती वाढविणे आपल्या हातात नाही, असं आतापर्यंत वाटत होतं. पण आता हा समज मनातून काढून टाका. शास्त्रज्ञांनी स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी एक सोप्पा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. थोडं टेन्शन होईल, पण स्मरणशक्तीसाठी एवढं करावंच लागेल. स्वतःचा चांगला मूड वारंवार खराब करून घ्यायचा आहे! त्यामुळे स्मरणशक्ती वाढीस लागेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. युनिव्हर्सिटी ऑफ मिसौरी येथील मुख्य संशोधनकर्ता एलिजाबेथ मार्टिन यांनी हे अनोखे संशोधन केले. त्यात त्यांनी म्हटले आहे, की चांगला मूड आपल्या स्मरणशक्तीवर नकारात्मक प्रभाव टाकतो. संशोधनात त्यांनी शंभर लोकांना सहभागी करून घेतले. त्यातील ५० जणांना हॉलमध्ये बसवले. त्यांना एक मनोरंजक व्हिडिओ दाखविण्यात आला. व्हिडिओ पाहत असताना त्यांचा मूड कसा आहे, या बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यानंतर उर्वरित ५० जणांना एक निराश करणारा व्हिडिओ दाखविण्यात आला. तो पाहतानाही सर्वांच्या मूडवर लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांना व्हिडिओशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. ती चांगल्या मूडच्या लोकांना देता आली नाहीत. पण खराब मूड असलेल्यांनी तातडीने सर्व उत्तरे दिली. यातून शास्त्रज्ञांनी खराब मूड स्मरणशक्तीसाठी चांगला असल्याचा निष्कर्ष काढला.
Home »
» स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा मूड खराब!