सध्या अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणातही एकच चर्चा आहे, ती म्हणजे हिंदूहृदयसम्राट आणि तमाम मराठीजणांचे लाडके नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसèया मेळाव्यात ‘उद्धव आणि आदित्य यांना सांभाळून घ्याङ्क, या केलेल्या भावनिक आवाहनाची. शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणेच यंदाही शिवतीर्थावर पार पडला. पण, गेल्या ४५ वर्षांचा इतिहास असलेला हा मेळावा यंदा नेहमीसारखा नव्हता. याचे कारण होते शिवसेनाप्रमुखांची ढासळलेली तब्येत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बाळासाहेबांच्या तब्येतीत चढ-उतार सुरू आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होता येत नाही. विशेषत: गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येत अधिकच ढासळली आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे केलेल्या भाषणातून याची जाणीव सर्वांनाच झाली. बाळासाहेबांना धाप लागत होती. ‘मला आता चालवतही नाहीङ्क, हे त्यांचे उद्गार गेल्या ४५ वर्षांत प्रथमच तमाम शिवसैनिकांच्या आणि शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करणाèयंच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले. शिवसेनेचा दसरा मेळावा खरे तर शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याची संधी देणारा सण असतो. पण बाळासाहेबांना शिवसैनिकांना भावनिक आवाहन करण्याची गरज गेल्या ४५ वर्षांत कधीही पडली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी असे आवाहन केले आणि अवघ्या मराठीजणांच्या काळजाचा ठेकाच चुकला. प्रत्येकालाच बाळासाहेबांच्या प्रकृतीची qचता वाटायला लागली. हीच qचता त्यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही वाटली, तर त्यात आश्चर्य नाही. पण, शिवसेनाप्रमुखांनी यंदाच्या दसèया मेळाव्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर भागात पक्षाच्या पदरी पडलेल्या अपयशाबाबत शल्य व्यक्त करतानाच मराठी माणसांनी एकजुटीने एकत्र येण्याची आणि शिवसेनेच्या मागे उभे राहण्याचे आवाहनही केले होते. बाळासाहेबांची ही हाक जशी मराठी माणसांसाठी होती, तशीच ती राज यांच्यासाठीही होती, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. शिवसेनाप्रमुखांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राज यांचे नाव घेतले नाही; पण शिवसेनेपासून दुरावलेला आपला हा पुतण्या पुन्हा परत फिरावा, हे त्यांना नेहमीच वाटत आले आहे. त्यामुळेच मराठी माणसांनो शिवसेनेच्या मागे उभे रहा, हे त्यांचे आवाहन एका अर्थाने राज यांच्यासाठीच होते, हे उघडच आहे. आणि राज यांनीही काकांच्या या आवाहनाला लगेच प्रतिसादही दिल्याचे कालच्या त्यांच्या ‘मातोश्रीङ्क भेटीवरून दिसूनही आले. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर काही दिवस या पक्षावर टीका करण्याचे टाळले होते. पण शिवसेनाप्रमुखांनी एक-दोनदा ‘राज आपली कॉपी करीत आहेङ्क, असे भाषणांतून बोलून दाखविल्यावर आणि त्यातही ‘दादूङ्क उद्धव ठाकरे यांनी डिवचल्यावर राज यांनी शिवसेनेवरही ओरखडे मारायला सुरूवात केली होती. राज आणि उद्धव यांच्याकडून परस्परांवर केल्या जाणाèया टिकेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उच्चांकी पातळी गाठली होती. दोघेही थेट एकमेकांची नावे घेऊन टिका करीत होते. पण गेल्या काही दिवसांत हे चित्र पार पलटून गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले. विशेषत: चार महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागणे, हे कळताच राज यांनी अलिबागचा दौरा रद्द करून तातडीने माघारी फिरणे, आपल्या गाडीतून उद्धव यांना रुग्णालयातून घरी नेणे, दोन दिवसांनी उद्धव यांच्या अँजिओप्लास्टीच्या वेळी रुग्णालयात हजर असणे तसेच नंतर बाळासाहेबांच्या आजारपणात राज यांनी रुग्णालयात आणि घरीही जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे हे पाहून राज यांची मनसे आणि उद्धव यांची शिवसेना हे वेगवेगळे पक्ष खरेच आहेत का?, असाच प्रश्न मराठीजणांना पडू लागला होता. आताही दसरा मेळाव्यानंतर राज मातोश्रीवर जाऊन आले. गेल्या चार महिन्यांत राज यांची ही तिसरी मातोश्री भेट आहे. दरवेळी त्यांची भेट कौटुंबिक असल्याचे सांगण्यात येते. राज हे ठाकरे कुटुंबातीलच असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या प्रकृतीची qचता वाटणे साहजिक आहे. आणि त्यामुळे कुणी त्यांच्या मातोश्री भेटीवर शंका घेण्याची गरज नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा आणि दिशा देण्याची क्षमता असलेले बाळासाहेब आणि राज प्रत्येक भेटीत केवळ कौटुंबिक गप्पा मारत असावेत, यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. एकंदरीत उद्धव आणि बाळासाहेबांच्या आजारपणाच्या माध्यमातून राज यांची शिवसेनेशी जवळीक वाढली आहे, हे कुणाच्याही नजरेतून न सुटणारे आहे. राज यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये शिवसेनेवर एकदाही टीका केलेली नाही. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, हे जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांप्रमाणेच शिवसेनाप्रमुखांनाही वाटते. शिवसेनाप्रमुखांसारखी आक्रमक शैली, कोणताही प्रश्न धसाला लावण्याची धमक, कुणाचीही तमा न बाळगता बेधडक बोलण्याची वृत्ती, संधी मिळताच राजकीय विरोधकांवर बोचरी टिका करण्याची खासियत राज यांच्यात आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. विशेषत: गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रात शिवसेनेची होणारी पिछेहाट राज यांच्यासारखा आक्रमक नेताच रोखू शकेल, असे वाटत असल्याने काही शिवसैनिक त्यासाठी प्रयत्नही करीत आहेत. राज आणि त्यांचे मनसैनिक वेळोवेळी राज पुन्हा शिवसेनेकडे परतणार नाहीत, असे ठासून सांगत असले तरी राजकारणात काहीही अशक्य नसते, हे त्यांनाही माहीत नाही, हे कसे असू शकेल. राज यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी स्वत:च्या बळावर पहिल्याच झटक्यात १३ आमदार निवडून आणले. नाशिकसारखी महापालिकाही ताब्यात घेऊन दाखविण्याची किमया केली. अनेक महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये मनसेचा उदय झाला. हे सारे राज यांची वाढणारी राजकीय उंचीच दाखविणारे आहे. याची जाणीव शिवसेनाप्रमुखांनाही आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी एकदा खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आताही दसरा मेळाव्यात त्यांनी मराठी माणसांनी एकत्र यावे, असे सांगत अप्रत्यक्षपणे राज यांनाही साद घातली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि मनसेची वाढती जवळीक हे महाराष्ट्रासाठी सुचिन्हच मानायला हवे. हे दोन पक्ष एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते, हे राजकीय धुरिणांना माहीत आहे.