चांगल्याला चांगले अन् वाईटाला वाईटच म्हणा : मुख्यमंत्र्यांचा सल्ला
उस्मानाबाद - औरंगाबादचे दैनिक लोकमतचे उपसंपादक रविंद्र गाडेकर यांना उस्मानाबादेत आज कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांनी कोणताही अतिरेक न करता, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा त्यांचा वसा जपावा, असे प्रतिपादन केले.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणाऱ्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे उपाध्यक्ष राहूल मोटे,आमदार राणाजगजीतसिंह पाटील,आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, आ.बसवराज पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते रविंद्र गाडेकर (दै.लोकमत औरंगाबाद), बाबुराव पाटील (दै. सकाळ, भोकर, जि. नांदेड), अशपाक पठाण (दै. लोकमत, लातूर) प्रशांत शेटे (दै. सकाळ, चाकूर, जि. लातूर),विजय मुंढे (दै. पुण्यनगरी,उस्मानाबाद),ॲड. दिगंबर गायकवाड (दै.देशोन्नती-कंधार,नांदेड), संजय शिंदे (दै.लाँग लाईफ टाइम्स,उदगीर,जि.लातूर),प्रवीण पवार (दै.दिव्य मराठी,उस्मानाबाद), प्रदीप पाटील (दै.सकाळ,नरसीफाटा, जि.नांदेड), लक्ष्मण मोरे (दै.लोकमत, ता.लोहारा,जि.उस्मानाबाद),अभयकुमार दांडगे, (दै. प्रजावाणी,नांदेड) यांना कै.भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात आले. तर पत्रकार संघाने सदस्यांसाठी सुरु केलेल्या अपघात विमा योजनेतील विमा पाँलिसींचेही मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पत्रकार संघाने सदस्यांसाठी तयार केलेल्या ओळखपत्रांचेही यावेळी वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, आज पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले आहे. यापुर्वी मुद्रीत माध्यमांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात लेखन करणाऱ्यांना, संपादकांना अतिशय मोठी प्रतिष्ठा होती. त्यातही कै. भालेराव यांनी आपली आगळी प्रतिमा निर्माण केली होती. आता माध्यमांचे अनेक पर्याय पुढे आले आहेत. अनेक वाहिन्या, इंटरनेट आणि मोबाईलमुळे माहिती आणि ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. याच काळात प्रशासनातील पारदर्शकता हा मुद्दा चर्चेत आला. त्यासाठी केंद्र सरकारने माहिती अधिकाराचा कायदा केला. त्याचा वापर पत्रकार आज प्रभावीपणे करत असल्याचे दिसून येते. राज्याचा संतुलित विकास हे आजचे आव्हान असल्याचे नमुद करून श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या संतुलित विकासासाठी अनेक घटकांनी योगदान देण्याची गरज आहे. त्यात पत्रकारितेचेही महत्व मोठे आहे. त्यासाठी कै. भालेराव यांच्यासारखी पत्रकारितेतील लढाऊ वृत्ती जोपासतानाच विकासाची दृष्टी घेऊन काम करावे लागेल. पत्रकार संघाच्या पत्रकार भवनासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ लाख रुपयाची देणगी जाहीर केली. मुख्यमंत्री निधीतून हा निधी दिला जाईल,असे त्यांनी सांगितले.लकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी ग्रामीण विकासाच्या योजनांवर पत्रकारांनी लक्ष केंद्रीत करावे व ग्रामीण भागातील विकास कामांना सकारात्मक प्रसिध्दी दयावी,असे आवाहन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. राजाभाऊ वैद्य यांनी आभार मानले.