मनपा निवडणूक निकालानंतर अशोकरावांना पुन्हा आनंदाचा धक्का!
प्रतिनिधी
औरंगाबाद : नांदेड महापालिका निवडणुकीत नागरिकांनी बाजूने कौल दिल्यानंतर आनंदाचा एक धक्का बसला असतानाच, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना आज पुन्हा दिलासादायी बातमी मिळाली. अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात पेड न्यूज आणि मतदान यंत्रात फेरफार केल्याची याचिका डॉ. माधव किन्हाळकर यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.ती खंडपीठाने फेटाळून लावली.
सन २००९ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोकराव चव्हाण निवडून आले होते. मात्र त्यांच्या वैधतेस आव्हान देणारी ही याचिका डॉ. किन्हाळकर यांनी दाखल केली होती. थेट निवडणूक रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. खंडपीठात सुनावणीदरम्यान याचिकेत केवळ चव्हाण यांच्यावर आरोप आहेत. सबळ पुरावे नाहीत, अशी बाजू चव्हाण यांचे वकील प्रवीण शहा मांडली. आरोपांची चौकशी करावी इतकेही त्यात तथ्य नाही, असे खंडपीठाने स्पष्ट करून याचिका फेटाळली. चव्हाणांच्या बाजूने अॅड. प्रवीण शहा, अॅड. अनिकेत भक्कड आणि अॅड.मंत्री यांनी तर याचिकाकत्र्यांच्या बाजूने अॅड. हर्षद पाडळकर आणि अॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. मात्र खंडपीठाच्या निकालावर डॉ. किन्हाळकर समाधानी नसून, ते निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. निकालावर अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयीन प्रक्रियेवर आपला पूर्ण विश्वास आहे, जनता आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.