औरंगाबाद : सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी मनपाच्या एकूण २७ मालमत्ता गहाण राहणार आहे. आजच्या बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत ठरविण्यासाठी एस. बी. एस. अँण्ड असोसिएटस या संस्थेला ५ लाख रुपये देण्याचा प्रस्तावही स्थायी समितीने मंजूर केला आहे. मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या जातील.
qकमत ठरविण्यासाठी कंपनीने साडेसात लाख रुपयांची मागणी केली होती. ५ लाखांमध्ये वाटाघाटी झाल्या. ३०० कोटी रुपये किंमत असलेल्या मालमत्तांचे ५ लाखांत व त्यावरील मालमत्तांच्या पाहणीसाठी १ हजार ५०० रुपये प्रतिकोटी रुपयांसाठी देण्यात येणार आहेत. हुडकोच्या १८५ कोटींच्या कर्जासाठी एकूण कर्जाच्या २२५ टक्के जादा मूल्य असलेल्या मालमत्ता हुडकोकडे तारण ठेवाव्या लागतील. तर समांतरसाठी ३०० कोटींचे कर्ज हवे आहे. त्यासाठी देखील ३०० कोटी बाजारमूल्य असलेल्या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवाव्या लागतील. कार्यकारी अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले की, ३०० कोटी रुपये समांतरच्या सुरक्षा हमीसाठी लागणार आहेत. १८५ कोटी रुपये हुडकोच्या कर्जासाठी लागणार आहेत. ही सर्व रक्कम कर्जातून उभी करायची आहे. त्यासाठी पालिकेच्या मालमत्ता तारण ठेवाव्या लागतील, असे सूत्रांनी सांगितले.