Home » , , » औरंगाबाद न्यूज लाइव्ह... का व कशी?

औरंगाबाद न्यूज लाइव्ह... का व कशी?

Written By Aurangabadlive on शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२ | ५:३८ AM

manoj sangle 
सल्लागार संचालक सांगतात, मीडिया प्लसविषयी....
औरंगाबाद न्यूज लाइव्ह सुरू केली ती मीडिया प्लस या फिचर्स संस्थेनं. मीडिया प्लसचे कार्यकारी संचालक मनोज सांगळे यांच्या कल्पनेतून ही वेबसाईट सुरू झाली आहे. स्वतः तेच वेबसाईटचे संपादकही राहणार आहेत. मनोज सांगळे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील. काही काळ बुलडाण्यात पत्रकारिता केल्यानंतर २००३ साली ते औरंगाबादला आले आणि सकाळच्या संपादकीय विभागात रूजू झाले. सकाळनंतर मुख्य उपसंपादक म्हणून सांजवार्ताच्या संपादकीय विभागाची सूत्रे त्यांनी हाती घेतली होती. नंतर पुण्यनगरी वृत्तपत्र समूहात ते रूजू झाले. त्यानंतर दिव्य मराठीत आणि लगेचच महाराष्ट्राचा मानबिंदू मानल्या जाणाèया लोकमतमध्ये ते रूजू झाले. या वर्षी मार्चमध्ये त्यांचा करार संपताच, काही जवळच्या व्यावसायिक मित्रांना हाताशी धरून त्यांनी मीडिया प्लसची स्थापना केली. गुणवत्ता आणि मेहनतीची तयारी असेल तर काहीच असाध्य नाही, हे त्यांनी मीडिया प्लसच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले. एवढ्या कमी वयात पत्रकारितेचा इतका अनुभव असणारा, सतत काही ना काही क्रांतीकारी उपक्रम राबवणारा आणि पत्रकारितेचा खोलवर अभ्यास असणारा हा पहिलाच पत्रकार असावा. मीडिया प्लसचा पसारा आता महाराष्ट्रभर पसरला आहे. राज्यातील एकूण  ३५ दैनिकं मीडिया प्लसची सेवा घेत आहेत. मीडिया प्लसच्या सहकार्याने दोन स्वतंत्र वृत्तपत्रेही सुरू झाली आहे. आता वेबसाईट सुरू करून, आणखी एक दिमाखदार पाऊल मीडिया प्लसने टाकले आहे.
- भगवान साळवे, सल्लागार संचालक, मीडिया प्लस
----------------------------------------------------------------------------------------------------
संपादक सांगतात वेबसाईट सुरू करण्याचं कारण...
औरंगाबाद न्यूज लाइव्ह वेबसाईट का सुरू करावीसी वाटली याला काही कारणं आहेत. मागे जवाहरनगर पोलिस ठाण्यात परधर्मिय जोडपे एकत्र आल्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता, ते प्रकरण नक्की काय आहे आणि तिथे नक्की काय घडलं, याची मोठी उत्सुकता सर्वांना लागली होती. पण कळण्यास मार्ग नव्हता. मी त्याच परिसरातला रहिवासी असल्याने शेजारीपाजारी आणि अनेक मित्रांचे फोन येऊन गेले आणि त्यांनी माहिती घेतली. थोडक्यात म्हणजे त्यांची उत्सुकता दूर करण्याचे आणि खरे जाणून घेण्याचे कोणतेही माध्यम त्यांच्याकडे नव्हते आणि त्यांना दुसèया दिवशी पेपर घरी येईपर्यंतही सबूर नव्हती... अर्थात ही घटना प्रातिनिधीक स्वरुपाची. आठवड्यातून एक तरी अशी संयमाची परीक्षा पाहणारी घटना शहरात घडतच असते. मग अशा वेळी शहरवासियांना अफवांवर विश्वास ठेवण्याशिवाय काही पर्याय नसतो. पण त्यामुळे मनात भीती आणि वेगवेगळ्या शंका-कुशंका जागा घेत असते... हे सर्व टाळण्यासाठी औरंगाबादची स्थानिकची अशी एक तरी न्यूज वेबसाईट असावी. जी शहरातील ताज्या चांगल्या- वाईट घडामोडी तातडीने शहरवासियांना कळवेल, त्याचा सविस्तर वृत्तांत देईल. म्हणजे जे घडलं, जसं घडलं ते काही मिनिटांत सर्वांना कळेल, अशी कल्पना डोक्यात आली. औरंगाबादेत बहुतांश मंडळी इंटरनेट हाताळते. अनेकांच्या घरी नेट कनेक्शन आहेत, कुणाकडे लॅपटॉप आहेत आणि काही मोबाईलवर इंटरनेट उघडून बसलेले असतात. त्यामुळे वेबसाईटचा उद्देश साध्यच होणार होता. अर्थात काही दैनिकांच्या वेबसाईटही ताज्या बातम्या देतात. पण ते स्वरूप अत्यंत तोकड्या स्वरुपाचे असते. त्यांना वाटेल तितकी ती घटना मोठी असायला लागते तरच ती वेबसाईटवर दिसते. जवाहरनगर पोलिस ठाण्यात काय झाले हे दैनिकाच्या ऑनलाइन आवृत्तीवर येईल, म्हणून माझे बरेच मित्र सायबर कॅफेत गेले होते, पण त्यांना कोणतीच बातमी त्यावर दिसून आली नाही. थोडक्यात त्यांना जी महत्त्वाची वाटेल तिच बातमी ते वेबसाईटवर टाकतात. त्यामुळे सामान्यांना पाहिजे ती बातमी त्या वेबसाईटवर असतेच असे नाही. औरंगाबाद न्यूज लाइव्ह सुरू करण्याचा निर्णय या सर्व गोष्टींचा विचार करूनच घेतला. अर्थात औरंगाबादकरांच्या अपेक्षेत आम्ही लगेच उतरू, असे नाही पण त्यात कोणतीही कसर सोडणार नाही एवढं नक्की. शहरातील प्रत्येक ताजी बातमी. मग तो कोणता कार्यक्रम असो की, गुन्हेविषयक घटना, आंदोलन असो की, राजकीय बदल सर्व प्रकारच्या शहर आणि जिल्ह्यात घडणाèया बातम्या औरंगाबाद न्यूज लाइव्ह प्राधान्यक्रमाने देणार आहे. अर्थात हे करताना सामान्यांचे प्रश्न सोडविण्याची महत्त्वपूर्ण भूमिकाही वेबसाईट बजावणार आहे. अर्थात हे करताना आमच्या संपूर्ण टीमला आपली साथ हवी आहे. औरंगाबाद न्यूज लाइव्ह वाचताना फेसबुक ऑप्शनवर लाइक केल्याशिवाय साईट सोडू नका. त्यामुळे नक्की किती लोक औरंगाबाद न्यूज लाइव्हशी जोडले गेले आहेत, याचा अंदाज आम्हाला येत राहील आणि कदाचित त्यामधून एखादी नवी चळवळही उदयाला येईल!!!
- मनोज सांगळे, कार्यकारी संचालक, मीडिया प्लस.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.