सहलीवर आलेली १२ वर्षीय विद्यार्थिनी माता बनल्याची धक्कादायक घटना नेदरलॅन्डमध्ये घडली असून, ही विद्यार्थिनी गर्भवती असल्याची भनकही कुणाला लागली नव्हती, हे विशेष. तिच्या बाळाचा बाप कोण आहे, याचा शोध आता घेतला जात असून, मुलीने मात्र ‘त्याचे नाव अजून मनातच ठेवले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र टेलिग्राफमध्ये आलेल्या बातमीत म्हटले आहे, की विद्यार्थिनी नेदरलॅन्डच्या ग्रोनिनगेन शहरातील रहिवासी आहे. सामान्यपणे युवती किंवा महिला गर्भवती राहिल्यानंतर त्याची लक्षणे दिसत असतात. पण या मुलीच्या बाबतीत तशी कोणतीही लक्षणे आधी दिसून आली नाहीत. याशिवाय शरीराने जाडजूड असल्याने तिच्या वाढत्या पोटाबाबतही कुणाला शंका आली नाही. गेल्या आठवड्यात ती शाळेच्या सहलीत सहभागी झाली होती. सहलीदरम्यान अचानक तिच्या पोटात कळा सुरू झाल्या. त्यामुळे शिक्षकांनी आपात्कालिन सेवेला दूरध्वनी करून मदत मागितली. रूग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक जेव्हा त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी विद्यार्थिनी माता बनणार असल्याचे सांगितले. हे ऐकून शिक्षकांसह सर्वच जण चकीत झाले. त्यानंतर तिला जवळच्याच एका रूग्णालयात नेण्यात आले. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. विद्यार्थिनी आणि तिच्या मुलीची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थिनीच्या माता- पित्याला धक्का बसला असून, मुलगी गर्भवती कशी राहिली, याचे कोडे त्यांना पडले आहे. तिच्यावर कुणी बलात्कार केला होता, की तिने स्वतःहून कुणाशी संबंध ठेवले होते, याबद्दल ते आता माहिती घेताना दिसत आहेत. १२ वर्षांची विद्यार्थिनी माता बनल्याची बातमी काही प्रमुख वृत्तपत्रांनी दिल्यानंतर नेदरलॅन्डमध्ये एकच खळबळ उडाली आहे.