औरंगाबाद : एटीएममधून पैसे काढल्यानंतर पायी जात असलेल्या तरुणास अडवून तीन जणांनी लुटल्याची घटना खडकेश्वर भागात काल रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहिती अशी की, जयभीमनगर येथील रहिवासी अरुण पंडित पगारे (२७) यांनी काल रात्री खडकेश्वर येथील सारस्वत बँकेच्या एटीएममधून पाच हजार रुपये काढले. ही रक्कम घेऊन तो नारळीबागमार्गे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या भिंतीजवळून पायी जात होता. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन खंडागळे (रा. ज्युबिली पार्क) आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यास अडविले. यावेळी दोन आरोपींनी त्यास पकडून ठेवले, तर लखनने त्याच्या खिशातील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. यावेळी अरुण यांनी आरडाओरड केली असता आरोपींनी त्याच्या गळ्यावर ठोसे मारले आणि ते तेथून पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ आपल्या भावाला बोलावून घेतले आणि सिटीचौक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेख अकमल हे करीत आहेत.
