औरंगाबाद : धूम स्टाईल मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना औरंगाबाद शहरात घडल्या. पदमपुरा येथून ६० हजार, श्रीकृष्णनगर येथून ३० हजार तर एन-३ मधून ८० हजार रुपयांचे दागिने लांबविले. गीता राजेंद्र कुंडलवाल (४९, रा. सोनार गल्ली, पदमपुरा) या पितृपक्षानिमित्त नंदू घोडेले यांच्याकडील कार्यक्रमाहून घरी पायी जात असताना साईसृष्टी अपार्टमेंटजवळ दोन मोटारसायकलस्वार त्यांच्या जवळ आले. वेग कमी करून त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. कुंडलवाड यांनी प्रसंगावधान राखून मंगळसूत्र ओढणाèयाला झटका दिला, त्यामुळे त्याच्या हातात दोन तोळ्याचाच तुकडा गेला. हा प्रकार कारमध्ये बसलेल्या एकाने बघून त्या दुचाकीस्वार भामट्यांचा पाठलाग केला; परंतु ते भामटे सापडले नाहीत. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झाला. मुकुंदवाडी येथे नातेवाईकांच्या सांत्वनासाठी गेलेल्या मंजुळा ज्ञानेश्वर माळवे (६०, रा. अजबनगर, खोकडपुरा) यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र दोन मोटारसायकलस्वार हिसकावून फरार झाले. हा प्रकार दुपारी ४ वाजेच्या सुमारास एन-३ मध्ये घडला. मंजुळा माळवे व त्यांच्यासोबत दोन जणी पायी निघाल्या होत्या. दोन मोटारसायकलस्वार वेगात त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व ते पळून गेले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तिसèया घटनेत श्रीकृष्णनगरातून शीतल जागतिया यांचे ३० हजाराची चेन दोन मोटारसायकलस्वारांनी लांबविली. जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.