प. पू. शुकदास महाराजांची माहिती
मनोज सांगळे
हिवरा आश्रम (ता. मेहकर, जि. बुलडाणा) : सध्याच्या जीवनशैलीत आहारात मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून, त्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत. चुकीच्या खाणपाणाचा परिणाम मात्र त्यांना होणाèया अपत्याला भोगावा लागतो आणि याचा परिणाम म्हणून अनेक अंध मुले जन्माला येतात, अशी माहिती बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील विवेकानंद आश्रमाचे संस्थापक प. पू. शुकदास महाराज यांनी दिली.
महाराजश्री म्हणाले, की सध्याचे युग धावपळीचे आहे. त्यामुळे साहाजिकच आहाराकडे सर्वांचे दूर्लक्ष होत आहे. त्यातून वेळी -अवेळी खाणे-पिणे, आहारातील सतत बदलाव यामुळे आरोग्यावर परिणाम होतोच, पण यामुळे शरीरातील सूक्ष्म अन्नद्रव्येही कमी होत जातात. याचा परिणाम म्हणून मायक्रोऑप्थॅल्मस व अनऑप्थॅल्मस रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकीकडे स्वतःच्या शरीराबरोबरच ते होणाèया अपत्यालाही धोका बनत चालले आहेत. शरीराला हवे असलेले अन्नघटक मिळत नसल्याने १ लाख बालकांमध्ये १४ बालके अंध जन्माला येतात. हे टाळण्यासाठी मूल होण्याची इच्छा असलेल्या दाम्पत्याने आहाराचे नियोजन करायला हवे. शरीराला सर्व पोषक घटक मिळतील, याकडे लक्ष द्यायला हवे, असेही महाराजश्री म्हणाले. पुरुषांमध्ये आणि काही प्रमाणात स्त्रियांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनताही महाराजांनी अपत्याच्या शारीरिक विकलांगतेला कारणीभूत ठरवली आहे. जमिनीमध्ये पेरताना आपण बीज उच्च प्रतिचेच घेतो मग हा तर जीवनातील सर्वसाधारण नियम आहे. मनुष्याने आहाराकडे होत असलेले दूर्लक्ष व त्यांच्यामध्ये वाढत असलेले व्यसनाधिनता दूर करावी, असे स्वामी शुकदास महाराज म्हणाले. आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये, डॉ. मेंढे, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णूपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात स्वामी शुकदास महाराज यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. १९७२ पासून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाèया स्वामी शुकदास महाराजांनी आजपर्यंत जवळपास १ कोटी १० लाख रुग्ण तपासले आहेत. कोण्या एका व्यक्तीने एवढ्या मोठया प्रमाणात रुग्ण तपासण्याचा हा जगातील विक्रमच आहे.