औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षाच्या भावाला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील लोहगाव-ढाकेफळ रस्त्यावर घटली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातून घटना घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. माजी जि. प. अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील लघाने यांचे डॉ. विठ्ठलराव भाऊराव लघाने पाटील (४५) धाकटे बंधू होत. पैठण तालुक्यातील पानरांजणगाव (खुरी) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. विठ्ठलराव भाऊराव लघाने पाटील हे बुधवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास शेताला भेट देऊन लोहगाव-ढाकेफळ रस्त्यावरून आपल्या (एमएच-१२ सीआर-१३५८) इंडिका कारने परतत होते. मदरसा शाळेसमोर जीपमध्ये आलेल्या चार ते पाच अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे डॉ. विठ्ठलराव कार थांबवून खाली उतरताच जीपमधील आरोपीही खाली उतरले. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर टॉमीने हल्ला केला. यामुळे सोबत असलेला एकजण जिवाच्या भीतीने पळून गेला. १५ वर्षांपासूनचा विश्वासू असलेला सालगडी फकीरचंद गाडेकर याने हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडेकर अपंग असल्याने मदतीसाठी मदरशाकडे धावला; मात्र तो मदरशातून परत येईपर्यंत हल्लेखोरांनी सोबत आणलेले रॉकेल-पेटड्ढोल, अॅसिड अचानक त्यांच्या अंगावर टाकून आग लावली आणि ते फरार झाले. अचानक घडलेल्या घटनेने जिवाच्या आकांताने डॉ. विठ्ठलराव लघाने यांनी आरडाओरड करून बचावासाठी खूप प्रयत्न केला; परंतु ते या घटनेत गंभीररीत्या भाजले गेल्याने घटनास्थळीच त्यांचा तडफडून मृत्यू झाला.