औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना नारेगाव परिसरात घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. कैलास बद्रीनाथ पवार ( ३४ ) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा माळेगावचा आहे. पत्नी रुपाली (२८) सह पाच वर्षांपासून तो नारेगावला भाड्याच्या घरात राहायचा. पवार चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीत हंगामी कामगार आहे. त्याची पत्नीही कामाला जायची. सात वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. मूल होत नसल्याच्या कारणावरून कैलास रुपालीशी भांडायचा. वर्षभरापासून तो तिच्या चारित्र्यावरही संशय घेत असे. त्यावरून दोघांत वाद चांगलेच विकोपाला गेले होते. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी रागाच्या भरात कैलासने रुपालीचा साडीने गळा आवळला. त्यात ती मरण पावली. नंतर पोलिस पकडतील या भीतीपोटी तो रात्रीच गरजेचे सर्व कपडे आणि इतर साहित्य घेऊन पळून गेला. पळून जाण्यापूर्वी घराचे दार लावले होते. सकाळी ९ वाजले तरी रुपाली बाहेर दिसली नाही म्हणून शेजाèयांनी तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दार लोटून आत बघितले असता रुपालीच्या गळ्याभोवती साडी आवळली असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली. सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी, पोलिस निरीक्षक जी.एच. दराडे आणि त्यांच्या सहकाèयांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच रुपालीचा भाऊ भागीनाथ विष्णू चव्हाण (रा. जाधववाडी) आणि नातेवाईक घटनास्थळी आले. भागीनाथ चव्हाणने दिलेल्या फिर्यादीवरून कैलास पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.