औरंगाबाद : पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्याची श्वेतपत्रिका जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. माळी समाज जागृती मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. मुंडे पुढे म्हणाले की, गेल्या बारा वर्षात पाटबंधारे मंत्री असलेल्या नेत्यांची चौकशी होणे आवश्यक असून या विभागाअंतर्गत जी कामे मंजूर झालेली आहे. मात्र अद्याप सुरू झाले नाहीत ते कामे रद्द करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांची आणि त्यांच्या नातलगांची संपत्ती जाहीर करून याविषयी श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी करून खा. मुंडे म्हणाले की, केंद्रासह राज्यातील सत्तांतर अटळ आहे. या शासनाच्या काळात महागाईने शिखर गाठले आहे. रोज उघडकीस येणारा भ्रष्टाचार तसेच सरकार मधील अंतर्गत कलह टोकाला गेेला आहे. यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून यामुळेच सत्तांतर होणारच असा दावाही खा. मुंडे यांनी यावेळी केला. शासनाच्या भ्रष्टाचाराविरूध्द आंदोलन छेडण्यात येणार असून त्याची सुरूवात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात औरंगाबादेतून केली जाईल. या आंदोलनाच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, असा आशावाद खा. मुंडे यांनी व्यक्त केला.