आपला चिमुकला जेव्हा संगणकासमोर बसून इंटरनेट हाताळतो तेव्हा त्याचे आपल्याला मोठे कौतुक वाटते. अल्पवयात त्याला असलेल्या इंटरनेटच्या ज्ञानाबद्दल आपला ऊर भरून येतो... पण कौतुक सोडा आणि जरा सावध व्हा... कारण इंटरनेटच्या वापरामुळे मुले वाईट व्यसनांकडे वळत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यासंदर्भात ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलमध्ये आलेल्या बातमीत म्हटले आहे, की कनाडाच्या क्वींस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. त्यात त्यांना दिसून आले की, संगणकाशी दीर्घकाळ चिकटून राहणारी मुले सामान्य मुलांच्या तुलनेत लवकर वाईट सवयींच्या आहारी जातात. किशोरावस्थेत येता येता या मुलांना सहा व्यसने जडलेली आढळतात. यात धुम्रपान, दारू पिणे, नशिल्या पदार्थांचे सेवन, असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करणे आणि सीट बेल्टचा वापर न करणे आदींचा समावेश आहे. संशोधकांचे प्रमुख वेलेरी कार्सन यांनी सांगितले, की हे संशोधन सोशल कॉगनीटिव्ह थेअरीवर आधारित आहे. दुसèयांच्या व्यवहाराची नक्कल करून व्यक्ती तो व्यवहार आचरणात आणत असल्याचे ही थेअरी स्पष्ट करते. आजकाल इंटरनेटवर अश्लील वेबसाईट आणि जाहिरातींचा भडीमार असल्याने मुलांना इच्छा नसूनही त्या बघितल्या जातात. याचा परिणाम त्यांच्या वर्तनावर होत जातो, असेही वेलेरी कार्सन म्हणाले.